महाराष्ट्र राज्य कबड्डी अससोसिएशन व मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने श्री स्वामी समर्थ क्रीडा मंडळ प्रभादेवी मुंबई आयोजित कै राजाभाऊ देसाई स्मृती चषक राज्यस्तरीय निमंत्रित जिल्हे कबड्डी स्पर्धेत शेवटच्या दिवशी उपांत्य फेरीत पहिल्या सामन्यात रत्नागिरीने रायगडचा ३२-२४ असा ८ गुणांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. रायगड रत्नागिरी हा सामना अटीतटीचा झाला, पण अखेरच्या क्षणी रायगडची सामन्यांवरील पकड सैल झाली आणि रत्नागिरीने सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. रायगड संघाचा कर्णधार आमिर धुमाळ या सामन्यातील सामनावीर ठरला.
दुसऱ्या उपांत्य फेरीचा सामना एकतर्फी झाला या सामन्यात यजमान मुंबई शहरने ठाणे संघाला ५०-२३ असे २७ गुणांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात मुंबई शहरचा कर्णधार अजिंक्य कापरे सामनावीर ठरला.
अंतिम फेरीचा सामना अपेक्षे प्रमाणे उत्कंटा वर्धक झाला. सुरुवातीला यजमानांनी रत्नागिरी संघावर लोण देत १५-१० अशी ५ गुणांची आघाडी घेतली खरी पण काही मिनिटातच अजिंक्य पवारच्या एका फसव्या चढाईने यजमानांना चकवले. अजिंक्यच्या या चढाईत ४गुणांची कमाई करत संघाला १५-१५ अशा बरोबरीत आणून ठेवले. मध्यंतरापूर्वी रत्नागिरी संघाने लोणची परत फेड करत १९-१७ अशी निर्णायक आघाडी घेतली. सामना संपण्यास काही कालावधी शिल्लक असताना रत्नागिरी संघाने दुसरा लोण देत सामन्यांवरील पकड मजबूत केली व सामना ३८-३२ असा ६गुणांनी जिंकत कै. राजाभाऊ देसाई स्मृती चषक पटकावला. या सामन्यात अजिंक्य पवार, अजिंक्य कापरे व ओमकार जाधव या चढाई पट्टुनी धार धार चढायांचा नजराणा प्रभादेवीकरांना दाखवला. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू-मालिकावीर म्हणून रत्नागिरीच्या रोहन गमरे याची निवड करण्यात आली त्याला मोटारसायकल देऊन गौरविण्यात आले. तसेच स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट चढाई व सर्वोत्कृष्ट पकड म्हणून मुंबई शहरच्या अजिंक्य कापरेची व रत्नागिरीच्या शुभम शिंदेची निवड करण्यात आली त्यांना LED टीव्ही देऊन गौरविण्यात आले. सामन्यातील सामनावीर म्हणून मुंबई शहरच्या ओमकार जाधवची निवड झाली.

loading